बुधवार, ४ डिसेंबर, २०१३

यशासाठी घ्या राईट टर्न


 

यशासाठी घ्या राईट टर्न
 
कधी कधी उत्तर शोधायचा घाईने प्रश्न आणखी बिकट होत जातात. गेल्या दहा वर्षात सतत टीव्हीवरच्या ब्रेकिंग न्यूज बघायच्या सवयीमुळे कदाचित आपल्यालासुद्धा घाईने उत्तर शोधण्याची सवय लागलेली आहे. मी तर म्हणेन की ब्रेकिंग उत्तरापेक्षा घ्या एक छानसा ब्रेक! प्रत्येक प्रश्न हा त्याच दिवशी सोडवला पाहिजे हा नियम बनवू नका, आणि ये दिन भी जायेंगेअसे म्हणत वस्तुनिष्ठपणे परिस्थितीचा शांतपणे विचार करा. प्रश्नाच्या उत्तरापेक्षा आपल्याला या गर्तेतून कुठल्याही परिस्थितीत बाहेर पडायचंय आहे अशी मनाशी खूणगाठ मारणं गरजेचे आहे. आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना (गरज वाटल्यास कुटुंबियांनासुद्धा) विश्वासात घ्या आणि प्रत्येकाला त्याचे स्वतंत्र विचार निर्भिडपणे मांडूद्या, कुठलाही किंतु न ठेवता त्यांच्याशी चर्चा करायला हरकत आहे. उत्तर कुठून वा कोणाकडून मिळाले यापेक्षा उत्तर मिळणे हे महत्त्वाचे आहे. जमल्यास एखाद्या त्रयस्थ माणसांबरोबर प्रश्नासंबंधी चर्चा करायचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे जेव्हा आपण आपले प्रश्न नव्याने मांडत जाता तेव्हा आपल्याच नकळतपणे त्याचे उत्तर सापडत जातं.

कित्येक मराठी उद्योजकांशी बोलताना मला त्यांच्यामध्ये आत्मविश्वास कुठेही कमी आढळला नाही. त्यांची विचार करण्याची पद्धतही बऱ्याचदा बरोबर असते. पण त्यांच्याबरोबर सखोल चर्चा करण्यासाठी त्यांच्या क्षेत्रातली जाणकार माणसं त्यांच्याजवळ नसतात. त्यांना थोडे प्रश्नेत्साहन देण्यासाठी व त्यांच्या मेहनतीचे व गुणांचे कौतुक करणारी, आपुलकीचे दोन शब्द बोलणारी हक्काची माणसे चटकन सापडत नाही. मोठे निर्णय घेताना कुणी तरी पाठीवर थाप मारून हो पुढे म्हणणारे हात नसतात! खरं तर आज सर्व क्षेत्रात मराठी माणसे आहेत व त्या त्या क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत आहेत आणि ही माणसे मदत करायलादेखील तयार आहेत; परंतु कदाचित तुम्हाला त्यांची पूर्ण माहिती नसेल. म्हणजे आपण माणसे ओळखण्यात आणि जोडण्यात नेटवर्किंगमध्येसुद्धा कुठे तरी कमी पडतो हे लक्षात घ्या. ही पोकळी तुम्हाला जाणीवपूर्वक आणि कष्टानेच भरून काढावी लागेल! पुढील काही लेखात नेटवर्किंगच्या संदर्भात मी सविस्तरपणे लिहिणार आहे.

मराठी समाजातील सर्व लहान मोठय़ा उद्योजकांना, तरुण-तरुणींना मी सांगू इच्छितो की, ‘स्वतंत्र व्यवसायकरणे ही फक्त गुजराती, मारवाडी किंवा सिंधी वा इतर कुणा एकाच समाजाची मक्तेदारी नाही हे लक्षात घ्या आणि स्वत:ला कुठेही कमी समजू नका. आजच्या आघाडीच्या उद्योजकांची यादी पाहिली तर मी काय म्हणतो हे सिद्ध होईल. आज टॉप उद्योजकांच्या यादीत असलेले रतन टाटा, नारायण मूर्ती, मुकेश अंबानी, सुनील मित्तल, विजय मल्ल्या, कुमारमंगलम बिर्ला हे कुठल्याही एका विशिष्ट जाती किंवा समाजाचे नाहीत. दुसरे, व्यवसायात सुरुवातीच्या काळात किंवा नंतर भेडसावणारे सगळे प्रश्न अगदी टाटापासून रिलायन्सपर्यंत आणि आजच्या आघाडीच्या इन्फोसिसलासुद्धा भेडसावले होते. नव्हे या घटकेलासुद्धा मोठ-मोठे प्रश्न त्यांनासुद्धा भेडसावत आहेत आणि उद्या पण त्यांना कितीतरी जटील समस्यांना सामोरे जावे लागणार आहे! मग तुम्ही कशाला घाबरताय? मला इथं इन्फोसिसच्या जन्माची थोडी माहिती देणे गरजेचे वाटते. १९८१ साली नारायण मूर्तीनी इन्फोसिसची सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे होते एक मोठे स्वप्न आणि खिशात शून्य पैसे! त्यांच्या पत्नी सुधा मूर्तीकडून त्यांनी दहा हजाराचे भांडवली कर्ज घेतले व उद्योजक होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण केले. मूर्ती कुटुंबांनी १९८२ साली पुण्यात दोन खोल्यांचे घर घेण्यासाठी एचडीएफसीकडून गृहकर्ज घेतले; पण रु. १२२४ चा मासिक हप्ता देण्यासाठी सुधा मूर्तीना रोज चार किलोमीटर चालत जाऊन रिक्षाचे पैसे वाचवत होत्या. त्या काळी श्री. व सौ. मूर्ती रोज एकमेकांना सांगत की आपल्याला काहीही करून गृहकर्ज फेडण्यासाठी किमान १३०० रुपये तरी कमावलेच पाहिजे! त्यानंतरचा इतिहास सर्वाना माहीत आहे.

हे सगळे सांगायचा उद्देश एकच की, कुठल्याही मोठय़ा व्यवसायाची सुरुवातही अशीच छोटय़ा प्रमाणात धडपडत ठेचकाळत होत असते, पण त्यांच्या मागे असते फक्त एक मोठे होण्याचे स्वप्न! आणि भांडवल असते त्यांची जिद्द! वरील कुठल्याही समस्यांनी घाबरून न जातापॉझिटिव्ह अॅटिटय़ूडठेवून व वस्तुस्थितीला धरून मोकळ्या मनाने आपण कुठलाही प्रश्न बघितला तर त्याचे उत्तर शोधणे केव्हाही कठीण नाही. व्यवसायात किंवा आयुष्यात आपण ज्याला प्रश्न समजतो तो यश मिळण्याच्या आधीचा एक टप्पा आहे जिथे एक राईट टर्न घेता आला पाहिजे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा